गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी उपाययोजना करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितली. त्यामुळे मत्स्यव्यवसाय वाढवण्यासाठी शासन काही कार्यवाही आणि उपाययोजना करणार आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ६४ तलाव मत्स्यव्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली आहे. विधान परिषदेचे भाजप आ. डॉ. फुके यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबाबत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने या मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना रोजगारासाठी गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब डिसेंबर, २०२४ मध्ये निदर्शनास आली आहे का असा प्रश्न डॉ. फुके यांनी उपस्थित केला. तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्योत्पादन प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत आणि मत्स्यव्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत कोणती कार्यवाही आणि उपाययोजना केली जाते आहे याबाबत माहिती देण्याबाबतही विचारण्यात आले. त्यावर बोलताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तर दिले. मत्स्यव्यवसाय विभागाकडील ६४ तलाव ३ जुलेै २०१९ च्या शासन निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण १४४ मालगुजारी तलाव, जिल्हा परिषद, गोंदिया यांचेकडून मत्स्यपालन सहकारी संस्थेस प्राधान्याने मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात आलेली आहेत, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी सभागृहाला दिली.

तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातबांध पध्दतीद्वारे पावसाळ्यात मत्स्यप्रजनन करुन मत्स्यबीज निर्मिती करणाºया संस्थांना प्रोत्साहन दिले जाते आहे. त्यासाठी वर्ष २०२२-२३ मध्ये बांध प्रजननासाठी उपयोगी असणाºया साहित्याचा पुरवठा ९ संस्थांना मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ८.९७ लाख रूपयांचा लाभ देण्यात आला होता, अशीही माहिती राणे यांनी सभागृहात दिली. तसेच जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी आवश्यक असणारे मासेमारी जाळे आणि नौका अनुदानावर खरेदीसाठी मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानाने स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेंतर्गत २१ लाख रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थसंकल्पित असून त्याचा लाभ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छिमारांना होणार आहे, असे सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *