तालुका प्रतिनिधी मोहाडी : राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थांना दरमहा १५०० रुपये अनुदान दिले जाते हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय अश्या स्तरावरुन बॅकेत जमा होत होते, ते थेट लाभार्थांच्या बॅक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार योजनेतील लाभार्थासाठी डिबीटी पोर्टल सुरु केले आहे. मात्र नोंदणी करण्यासाठी वृद्ध निराधारांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. हे वृद्ध उपाशी-तापाशी सकाळपासून अनेक लांब प्रवास करत येत असतात, त्यात अनेक दिव्यांग बांधव भगिनी सुद्धा असतात. कधी कधी त्यांना तहसील कार्यालयात येण्याकरिता अति कसरत करावी लागते आणि काही वृद्ध हे निराधार असुन त्यांच्या परिवारात एकही सदस्य नाही किंवा कोणी जवळीक नातेवाईक सुद्धा मदत करित नाही.
अश्यावेळी त्यांना २०-२५ किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्यच नाही. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहू नये करिता तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मोहाडी यांना शिवसेना मोहाडी तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदनानुसार डिबीटी नोंदणी प्रक्रिया हि प्रत्येक महसूल मंडल किंवा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये शिबीर राबवून किंवा तलाठी कार्यालयात नोंदणी शिबीराचे आयोजन करावे, यावर तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी यावर लवकरच विचार करुन मंडल विभागाप्रमाणे नोंदणी शिबीराचे आयोजन करणार असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी आसूड सामाजिक संघटना अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले, विधानसभा समन्वयक डॉ.शिवशंकर दृगकर, शिवसेना तालुका प्रमुख मधू बुरडे, शिवसेना शहर प्रमुख नारायण निखारे, शिवसैनिक संजय बारई उपस्थित होते.