भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ४ हजार ४०० मालगुजरी तलवांचे आता पुनरुज्जीवन होणार असून हे सगळे तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त होणार आहेत. यासंदर्भात विधानपरिषदेचे भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वपूर्ण सूचना केली होती. तसेच, या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवले होते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचबरोबर याविषयी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सचिवांसह इतर अधिकाºयांची बैठक बोलवून हे तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच, याकामी सरकारसह टाटा, नाम फाऊंडेशन गाळ उपसण्याचे कार्य करणार आहेत. यामुळे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
तलावांचे पुनरुज्जीवन आवश्यक विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरच्या पूर्व भागासह मराठवाड्यातील नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग रूपांतरित खडकांपासून बनलेला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या भागांमधल्या जमिनींमध्ये मुरण्याचे प्रमाण कमी आहे. गोंड राजांनी इथल्या धान पिकांची गरज ओळखून ३१ हजार ९०० हेक्टर सिंचनक्षमतेसाठी सुमारे ६ हजार ७०० तलाव बांधले पूर्वी बांधले होते. या भागात मुख्यत: धान पीक घेतले जाते. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे धानाच्या उत्पादनावर परिणाम होतो. माजी मालगुजरी तलाव या समस्येवर उपाय ठरले. १९५० मध्ये शासनाने हे तलाव ताब्यात घेतले आणि क्षमतेनुसार जिल्हा परिषद व जलसंधारण विभागाकडे वर्ग केले. मात्र, या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणीसाठा कमी होत असून भूजल पातळी घसरत आहे. यामुळे या तलावांचे पुनरुज्जीवन गरजेचे बनले आहे. आमदार डॉ. परिणय फुकेंचा पुढाकार या तलावांमध्ये साठलेला गाळ काढण्याची गरज आमदार डॉ. परिणय फुके यांनी ओळखली.
यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ मार्च रोजी त्यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उचलला. गाळमुक्त धरण याविषयच्या चर्चेत त्यांनी भंडारा, गोंदियामधले तलावही गाळमुक्त करण्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. तसेच, यासाठी त्यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्रही दिले होते. मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाईचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच, विधानपरिषदेत डॉ. फुके यांनी केलेल्या भाषणाची दखल घेत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वरिष्ठ अधिकाºयांची बैठक बोलावली. या बैठकीला डॉ. परिणय फुके यांच्यासह जलसंधारण विभागातील सचिव गणेश पाटील, उपसचिव, अवर सचिव, मुख्य अभियंता उपस्थित होते. मंत्री राठोड यांनी ४ हजार ४०० तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच, राज्य सरकारसह टाटा, नाम फाऊंडेशन या मोठ्या सामाजिक संस्था देखील आता पुढील २ ३ वर्षांत या तलावांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करणार आहेत. यामुळे, भंडारा, गोंदियातील माजी मालगुजरी तलावांची गाळ समस्या दूर करण्यात आमदार डॉ. परिणय फुके यांना यश आले असून याचा थेट लाभ हा या दोन्ही जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकºयांना होणार आहे.