सर्विस रोडवर वाढलेले अतिक्रमण, अतिक्रमण धारकांनी केले पक्के बांधकाम

रवि धोतरे /भंडारा पत्रिका लाखनी : शहराला २ भागात विभागून राष्ट्रीय महामार्ग गेला असून राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील सर्व्हिस रोडवर व मुख्य मार्गावर अतिक्रमणांचा विळखा घट्ट होत आहे. अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावरील पदपथांवर हातगाड्या थांबून असतात. रस्त्यावर हातगाडी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षरश: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. साकोली आणि भंडारा मध्ये मुख्याधिकाºयांच्या पुढाकाराने अतिक्रमण काढण्यात यश आले होते. मात्र लाखनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाºयाचे मौन चर्चेचा विषय ठरत आहे अतिक्रमण करणाºयांचे शहर म्हणून लाखनी शहराची ओळख बनू लागली आहे.

मुख्य बाजारपेठ असलेले सिंधी लाईन चौक, पंचायत समिती परिसर, तहसील कार्यालय परिसर याठिकाणी हातगाड्यांचा ठिय्या, खासगी प्रवासी, वाहनांचा थांबा यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. या परिसरात नेहमी छोटे-मोठे अपघात होतात, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. लाखनीत उच्च शिक्षणाची सोय, मोठी बाजारपेठ व तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून सर्वच शासकीय, निमश- ासकीय कार्यालयामुळे कार्यालयीन कामे, खरेदी व शिक्षणासाठी ग्रामीण परिसरातून दररोज हजारो महिला, पुरुष व विद्यार्थी शहरात येत असतात याशिवाय शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) मुळे वाहनांची वर्दळ असते. भरीस भर म्हणून बसस्थानक व तहसील तथा सिंधीलाईन चौकात महामार्गासह सर्व्हिस रोडवर प्रवासी वाहने तथा फुटकळ विक्रेत्यांची अतिक्रमणामुळे वाहन चालकास आजूबाजूने येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघाताचीशक्यता नाकारता येत नाही. शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, सिंधी लाईन, बसस्थानक परिसर, गांधी विद्यालय, कुमार पेट्रोल पंप परिसरासह लाखनी शहरात अतिक्रमणाचे जाळे तयार झाले आहे. दुकानदारांनी रस्त्यावर छत मारून विक्रीसाठी वस्तू मांडल्या आहेत.

नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिसांकडूनही थातूरमातुर कारवाही केली जाते विशेष म्हणजे, आठवडी बाजारात आलेले नागरिक पंचायत समिती जवळील उडाणपुलाच्या खाली आपले खासगी वाहने लावून ठेवतात त्यामुळे सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, नगरपंचायत लाखनी व्यवसाय करणाºया किरकोळ भाजी विक्रेते व हाताठेलेवाले यांच्याकडून दैनंदिन पावती देऊन पैसे घेतात. त्यामुळे या किरकोळ व्यावसायिकांना रस्त्यावर दुकान थाटण्याचे बळ मिळत असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे. दुकानाबाहेरील फलकापासुन ते थेट टेबल, हातगाडी, गॅरेजची पेटी ठेवण्यापर्यंत अतिक्रमण वाढले आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *