जल जीवन मिशनच्या अर्धवट कामामुळे सुकळी (डाक) येथे भीषण पाणी टंचाई

रमाकांत खोब्रागडे/ भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील सुकळी (डाक) येथे जलजीवन मिशनचे अर्धवट कामामुळे आधी सुरू असलेले पाणीपुरवठा विहिरीचे जलस्त्रोत्र बंद झाल्याने तसेच जलजीवन मिशनचे नवीन काम पूर्ण करण्याचा कालावधी संपून एक वर्ष लोटत असले तरी अर्धवट कामामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून या याबाबत ग्रामपंचायत तर्फे केलेल्या तक्रारीची चौकशी होऊनही पाणीटंचाई दूर होण्याकरता कुठलीही कार्यवाही होत नसल्याने सुकळीवाशी संताप व्यक्त करीत आहे. पंधरा-वीस दिवसात येथे चक्रधर स्वामींची यात्रा भरणार असून यामुळे येथे येणारे भाविक भक्तांनाही या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने जलजीवन मिशनचे काम केवळ कंत्राटदाराला बिल अदा करण्याकरता आहे का? असा प्रश्न सुकळीवासी यांना पडला आहे.

२०२४ पर्यंत सर्व ग्रामीण क्षेत्रात सर्वत्र प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्ता पूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट असून या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्ती स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट असले तरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मात्र जलजीवन मिशनची बहुतेक कामे अर्धवट असून यामुळे या योजनेचा बट्टयाबोळ झाल्याचे दिसत आहे. केवळ कंत्राटदारांना अर्धवट कामाचे बिल अदा करणे या योजनेचा उद्देश आहे का? असा प्रश्न सर्वत्र नागरिकांना होत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सुकडी (डाक). येथे जवळपास ३००० लोकसंख्या असलेले या गावी आधी सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात मिळत होते.

मात्र जलजीवन योजनेचे काम सुरू झाल्याने या योजने करता आधी असलेले विहिरीचे खोलीकरण करण्याकरता विहीर खोदण्यात आल्याने हे काम पूर्ण न केल्याने विहीर खचून आधी होत असलेला पाणीपुरवठाही कमी झाल्याने तसेच नवीन योजना अर्धवट असून विहिरीचे पाण्याचे स्त्रोत्र बंद झाल्याने सुकळी वासियांना मागील सहा ते आठ महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत गावकºयांचे तक्रारीवरून ग्रामपंचायत सुकळी तर्फे सरपंच व सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांचे कडे २८-१०२४ रोजी तक्रार करून गावातील पाणीटंचाई दूर करण्यास त्वरित जल जीवन मिशनचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी केली, यावरून जिल्हा परिषदेतर्फे काही अधिकारी सुकळी येथे येऊन त्यांनी सर्व कामाची चौकशी केली असता या कामामुळे येथे पाणीपुरवठाहोत नसल्याचे दिसून आले. असे असले तरी पुढे कुठलीही कारवाई न होता हीच परिस्थिती असून जुन्या पाणीपुरवठा योजनेचे मिळणारे पाण्यामुळे सुकळी गावातील काही भागात अत्यल्प पाणीपुरवठा होत असला तरी गांधी चौक, पवार मोहल्ला, बुरुड मोहल्ला या भागात पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

पंधरा-वीस दिवसातच चक्रधर स्वामींची मोठी यात्रा भरणार असून या यात्रेत ८० ते ९० हजार भाविक सामील होत असल्याने या पाणीटंचाईची झळ अधिक जाणवणार असल्याने तसेच सध्या नागरिकांना आवश्यक पाण्याकरता भटकंती करावी लागत असून गावातील बोरवेल, विहिरी, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाणी आणावे लागत असून याबाबत जिल्हा परिषद गोंदिया तर्फे जलजीवन मिशनचे कंत्राटदाराकडून त्वरित हे काम पूर्ण करून घ्यावे किंवा या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून काळे यादीत टाकून कार्यवाही करावी अशी मागणी सुकळी (डाक) वासीयांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *