भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : हिमालयाच्या पायथ्याशी, पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात आढळणाºया दुर्मिळ अशा युरेशियन आर्टर म्हणजे युरेशियन पाणं मांजरीच्या अस्तित्वाचा छायाचित्रात्मक पुरावा पहिल्यांदाच वनविभागाच्या हाती लागला आहे. १९७८ साली गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस शेवटची या प्राण्याची नोंद पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी केली होती. मात्र यावेळी कोका व्याघ्र प्रकल्पात हा प्राणी आढळून आला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९९२ च्या अनुसूची एक अंतर्गत संरक्षित आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ द्वारा धोकाग्रस्त वगीर्कृत असलेल्या पाणं मांजरी चे अस्तित्व नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या कोका व्याघ्र प्रकल्पात जाणवणे ही निसर्गप्रेमी आणि वन्यप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. नवेगाव नागझिरा अभयारण्याचा विस्तार १,८९४ किलोमीटर पर्यंत आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात विस्तार असलेल्या या क्षेत्रात सध्या वार्षिक व्याघ्र गणनेसाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे.
कोका वनपरिक्षेत्रांतर्गत लावण्यात आलेल्या कॅमेºयाांमध्ये पहिल्यांदाच या प्राण्याचे छायाचित्र नोंदविले गेले आहे. त्यामुळे दुर्मिळ अशा प्राण्याच्या वास्तव्याची पुष्टी झाली आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात याची छायांकित नोंद झाल्याचे समजते. या प्राण्याच्या भारतात तीन प्रजाती असून गोड्या पाण्यातील व सागरी परिसंस्था राखण्यात युरेशियन पाणं मांजर महत्त्वाचीभूमिका बजावतात असे सांगितले जाते. हे प्राणी निरोगी उभयचर पर्यावरणाचे सूचक म्हणूनही काम करतात. दरम्यान भंडारा जिल्ह्यात १९७८ साली निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी लेखक मारुती चितमपल्ली यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडे या प्राण्याचे वास्तव्य आढळून आल्याची शेवटची नोंद घेतली आहे. त्यावेळीही छायाचित्रित पुरावा कुठेही नव्हता. मात्र यावेळी व्याघ्रगणनेच्या कॅमेºयात हा प्राणी कैद झाल्याने छायाचित्रात्मक नोंद झाली आहे. या प्राण्याच्या नोंदीमुळे व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे दर्शन झाले आहे.