भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसरची आमसभा २८ मार्च रोजी स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडली. या वार्षिक आमसभेचे अध्यक्षस्थान आमदार राजुभाऊ कारेमोरे (तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र) यांनी भूषविले, तर सचिव म्हणून गट विकास अधिकारी नं. द. वाळेकर यांनी काम पाहिले. आमसभेला नरेश ईश्वरकर (बांधकाम व शिक्षण सभापती, जि. प. भंडारा),आनंद मलेवार (सभापती वित्त व आरोग्य), दीपिका गौपाले (सभापती पं. स. तुमसर), सुभाष बोरकर (उपसभापती पं. स. तुमसर), जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, श्रीमती. सुषमा पारधी, दिलीप सार्वे, राजेंद्र ढवाले, पं. स. सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सचिव, तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. आमसभेची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. गट विकास अधिकारी वाळेकर यांनी प्रास्ताविक केले. सभेचे कामकाज सुरळीत व व्यवस्थित व्हावे. सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागावे करिता जिल्हा परिषद सर्कल नुसार सभा घेण्यात आली.
यात सुसूरडोह पुनर्वसनासाठी एकच ग्रामपंचायत निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.विद्युत विभागाद्वारे सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उपाययोजना आखण्यात आली. जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांसाठी दर्जदार वर्गखोल्या गरजेचे असल्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना आखने, जल जीवन मिशन अंतर्गत कामे गतीने पूर्ण करणे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रखडलेली कामे त्वरित मार्गी लावणे.प्रलंबित घरकुल प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपाययोजना करणे. आमदार राजु कारेमोरे यांनी सभेतील सकारात्मक चर्चेसाठी सर्व पदाधिकारी व अधिकारी वर्गाचे आभार मानले आणि विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले. आभार प्रदर्शन सहाय्यक बिडिओ श्री. सानप यांनी केले.