भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : रा.स्व. संघाचे स्वयंसेवक दीड लाखांहून अधिक सेवाकार्य करीत असून यामागील प्रेरणा आहे संघ विचाराची. ही प्रेरणा स्वाथार्ची नक्कीच नाही. मजबुरीही नाही. शुद्ध सात्विक प्रेम हीच ती प्रेरणा आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालय प्रिमिअम सेंटरच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री व्यासपीठावर उपस्थित होते. आज शुभ योग असून अनेक मान्यवर उपस्थित असल्याचा उल्लेख करीत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, यासाठी तपस्या करावी लागते. माधव नेत्रालयाच्या अनेक वर्षांच्या तपस्येचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. तपस्येने पुण्य, पुण्यातून फळ मिळतं. पण ते फळ आपल्यासाठी न मागता त्याचा विनियोग लोककल्याणासाठीच करणे, या वृत्तीने ही तपस्या सुरू आहे. या मागील प्रेरणा संघ विचाराची आहे.
हा समाज आपला आहे. आपल्या सामर्थ्यासह या समाजासाठी शक्य ते करेन, प्रामाणिकता, नि:स्वार्थ भावनेतून, तन-मन धनाने. याच वृत्तीने सर्व क्षेत्रात संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत. आपल्यासाठी अपेक्षेसाठी नाही तर सर्वांसाठी कष्ट करण्याची प्रेरणा असते. बदल्यात काहीही नाही. अशा दीर्घ यात्रेतून संघ स्वयंसेवकांनी समाजाने पारखले. फलस्वरूप अनुकूलता आली, अडथळे दूर झाले, स्वयंसेवक पुढे जात आहेत, ध्येयाची तिच दृष्टी कायम ठेवून. सेवा कार्य दयाभावातून नाही. समाजाप्रति प्रेम, सर्वांनाच दृष्टी द्यायची आहे. चांगल्या कमार्तून प्राप्त फळाचा उपयोग विश्वकल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुदेर्वाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालयगत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे.
माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्त्वाची संस्था ठरणार आहे. माधव नेत्रालय ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी प्रास्ताविकात प्रिमीयम सेंटरची माहिती दिली. अंदाजे ५१७ कोटी रु. खर्च अपेक्षित असून तो गुडीपाडव्याला २०२८ मध्ये लोकार्पण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वासुदेवनगर मेट्रोरेल्वे स्थानकाचे माधव नेत्रालय नामकरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन, रविवार होता, वर्ष प्रतिपदेचा सुमुहूर्त, गुरुजींच्या नावाचा प्रकल्प, पंतप्रधानांची येथील उपस्थिती हा योगच असल्याचा उल्लेख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला.