भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : येथील पौराणिक अशा मुरलीधर मंदिराला ३० मार्च रोजी अचानक दुपारच्या सुमारास आग लागली. विद्युत प्रवाह खंडित असताना आग नेमकी लागली कशाने हा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. येथील विठ्ठल गुजरी वार्डात पौराणिक असे मुरलीधर मंदिर आहे. गोपाळ कृष्णाच्या या मंदिराची वास्तू अत्यंत पुरातन आहे.
आज ३० मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास मंदिराच्या सभागृहावरील खोलीला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरातील लोकांनी अग्निशामक विभागाला कळविले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागलेल्या या खोलीतील विद्युत प्रवाह देखील अनेक दिवसापासून खंडित आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट ने आग लागली नाही हे स्पष्ट असले आहे. अशावेळी सभागृहावर टाकून असलेल्या ताडपत्रीने उन्हामुळे पेट घेत आग लागली असावी, असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. मंदिरातील इतर भाग सुरक्षित आहे. मंदिर दिवसभर बंद राहत असल्याने भाविकांची देखील मंदिरात घटनेच्या वेळी वर्दळ नव्हती. मात्र उन्हामुळे ताडपत्री पेटून आगीची घटना घडली असेल, तर भविष्यात यापासून धडा घेत नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे हे मात्र नक्की.