भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, विदर्भातील अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने राज्यात काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाºयांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे, तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसाठी हा पाऊस मोठे नुकसानकारक ठरू शकतो. अवकाळी पावसामुळे पिके उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात उष्णतेची लाट
