भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तोट्यात चालत असल्याने पाणीपुरवठा मंडळाने १ एप्रिल २०२५ पासून ६५ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांच्या मध्यस्थीने हा निर्णय मागे घेण्यात आला असून, पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार आहे. या संदर्भात दिनांक ३० मार्च २०२५ रोजी एमटीडीसी रिसॉर्ट, नवेगाव बांध येथे महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अध्यक्ष म्हणून लायकरामजी भेंडारकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बेलपात्रे, केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार, पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, माजी उपसभापती होमराज पुस्तोडे, अजुर्नी मोरगाव, खांबी, शिरेगाव व रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळांचे प्रतिनिधी व समाविष्ट गावातील सरपंच व पाणीपुरवठा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत अध्यक्षांनी आश्वासन दिले की, पाणीपुरवठा योजना बंद होणार नाहीत आणि निर्माण होणारी तूट जिल्हा परिषदेमार्फत भरून काढली जाईल. तथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविण्या करिता सारखेच धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल व हे धोरणात्मक निर्णय येणाºया काही दिवसात अंमलात आणल्या जातील याच निर्णयाच्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंडळांच्या प्रतिनिधींनी माननीय कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया यांना निवेदन सादर केले आहे. यात योजनांचा नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा निधी अंतर्गत १० लाख रुपये मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून, भविष्यातही त्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी जिल्हा परिषद ठोस पावले उचलणार आहे.