रवी धोतरे/ भंडारा पत्रिका लाखनी:- तालुक्यातील चूलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातून अवैध रेतीचा उपसा करून विना क्रमांकाच्या स्वराज ७३५ कंपनीच्या निळ्या रंगाचा इंजिन व लाल रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉली चे साहाय्याने भूगाव मुरमाडी /तूप रस्त्याने वाहतूक करीत असताना डोंगरगाव फाट्याजवळ दुचाकी वाहनाने आलेल्या शासकीय कर्मचाºयाने ४० हजारात चणे फुटाने घेवून ती ट्रॅक्टर ट्रॉली पकडली पण अर्थकारण करून कसलीही कारवाई न करता ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्यात आल्याची घटना सोमवार (ता.३१ मार्च) रोजी सकाळी ९.३० ते १० वाजता दरम्यान घडल्याच्या मुरमाडी/ तूप परिसरात चर्चा होत आहेत . शासनाचा लक्षावधी रुपयाचा महसूल बुडविणारेते चणे-फुटाने पथक कोण ? याचा शोध घेऊन त्यांचेवर महसूल अधिनियमान्वये कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
लाखनी तालुक्याचे सीमावर्ती दक्षिणोत्तर भागातून चूलबंद नदी प्रवाहित होत असून ती लाखनी तालुक्याची जीवनदायिनी आहे. या नदीचे पात्रात अनेक रेती घाट असून या रेती घाटातील बारीक व पांढरीशुभ्र वाळू असल्यामुळे बांधकाम व्यवसायात प्रचंड प्रमाणात मागणी आहे पण शासनाने रेती घाटाचे लिलाव केले नाही तसेच रेती डेपो बंद असल्यामुळे रेती तस्करांचा उदय होऊन रेती घाटातील वाळूचा अवैध उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. भूगाव रेती घाटातून न्याहारवाणी , पहाडी, कवळसी इत्यादी गावातील रेती तस्करांकडून ८ ते १० विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ने अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असून शासनाने ठरवून दिलेले मापदंड झूगारून रात्रीबेरात्री रेती उपसा केला जात असला तरी खणीकर्म, पोलिस व महसूल विभागाकडून यावर प्रतिबंध लावण्याचे सौजन्य दाखविले जात नाही . हा प्रकार भूगाव रेती घाटावर मागील अनेक दिवसापासून सुरू आहे .
सोमवारी पहाटेपासून भूगाव रेती घाटातून तस्करांकडून रेतीचा उपसा करून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली चे साहाय्याने भूगाव ते मुरमाडी /तूप रस्त्याने अवैध रेतीवाहतूक करीत असताना डोंगरगाव/ साक्षर फाट्याजवळ दुचाकी वाहनाद्वारे आलेल्या डबल शीट कर्मचाºयांच्या पथकाने स्वराज ७३५ कंपनीचा निळ्या रंगाचा इंजिन व लाल रंगाची ट्रॉलीतून रेती वाहतूक करताना रंगेहात पकडली पण ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टी नसताना अर्थकारण करून ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्यात आली असे नाव न छापण्याचे अटीवर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सदर पथकाने प्रामाणिकपणे कारवाई केली असती तर शासनाला लक्षावधी रुपयाचा महसूल प्राप्त झाला असता . शासनाचा महसूल बुडविणारे ते पथक कोणते ? याचा वरिष्ठ अधिकाºयांनी शोध घेऊन त्यांचेवर महसूल अधिनियमान्वये कारवाई करणे गरजेचे झाले आहे .