भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील केसलवाडा (वाघ) येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व.निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय व वसतीगृह येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेऊन त्याच वस्तीगृहात राहत असलेला नवेगावबांध येथील विद्यार्थी धीरज सिताराम फरदे वय ११ वर्षे, या आदिवासी विद्यार्थ्याचे दि.२१ जुलै २०२४ रोजी दुपारी ४.३० ते ५ वाजता च्या दरम्यान राहत असलेल्या वसतीगृहात संशयास्पद घातपाताने निधन झाले. या दलित आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून धीरजच्या मृत्यूस कारणीभूत असणाºयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी म्हणून संबंधित शासन प्रशासनाला वेळोवेळी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
धिरज च्या घातपातास पाच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मागणीकरीता दि.१४ जानेवारी २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले असता जिल्हा पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दि. १६ जानेवारी २०२५ रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली. पण या घटनेस आठ महिण्याचा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाने दिलेला शब्द न पाळता उलट पोलीस विभागाकडून प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे सदर घटनेची सिबिआय चौकशी करण्यात यावी व गुण्हेगारांना अटक करुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
या मागण्यांकरीता दि.२ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर दुसºयांदा मृतक धीरज चे वडील सिताराम फरदे व केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीचे कार्यकर्ते महेन्द्र बाबुराव तिरपुडे हे दुसºयांदा आमरण उपोषणाला बसले असून गुन्हेगारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार. असे उपोषणकर्ते महेंद्र तिरपुडे यांनी आव्हान केले आहे. लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालयातील वस्तीगृहात ६७७७ विद्यार्थीनिवासी राहत असून त्या विद्यार्थ्यांची देखरेख, नियंत्रण व सांभाळ करण्याची जबाबदारी ही शाळेतील व वस्तीगृहातील अधिक्षक मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांची आहे. वसतिगृहात विद्यार्थ्याचा मृत्यू होणे व कोणावरही कार्यवाही न होणे मृत्यूच कारण मीमांसा न होणे ही संशयास्पद बाब आहे.
धीरज सिताराम फरदे या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय व वस्तीगृहात चालत असलेला हलगर्जीपणा, घडत असलेल्या दुर्दैवी घटना व शासनाच्या निधीची लूट करणाºया संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग यांची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करुन गुन्हेगारांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाºया व घटनेस जबाबदार जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी (आदिवासी विभाग) यांचे कडून कोणतीही चौकशी न करता दुर्लक्ष करणे. धीरज फरदेच्या मृत्यूची थातूरमातूर चौकशी करणाºया पोलीस अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. सदर घटनेचे पुरावे नष्ट करणाºया कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. पीडित कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी.
पीडित कुटुंबास न्याय मिळावा म्हणून उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यास व मृतक धीरज फरदे च्या पालकास काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाची असेल. शासन प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करुन धिरज फरदे च्या मृत्यूस जबाबदार कर्मचारी व अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, योग्य मार्गाने न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. उपोषण स्थळी केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.देवानंद नंदागवळी यांनी शासन प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान केले. उपोषणादरम्यान उपोषण कर्त्यांस वा त्यांच्या परिवारासोबत अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जिम्मेदारी संबंधित संचालक मंडळ व शासन प्रशासनाची असेल असे म्हटले आहे.