भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : गृहमंत्रालयाने खुल्या कारागृहात कैद्यांचे स्थानांतरण व्हावे यासाठी निकषांत बदल केले आहेत. या निर्णयामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे स्थानांतर खुल्या कारागृहात होत आहे. पयार्याने मध्यवर्ती कारागृहातील गर्दीवर नियंत्रण मिळाल्याने प्रशासनावरील भार कमी झाला आहे. राज्यभरातील ६० कारागृहात जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. दिवसेंदिवस राज्यभरातील कारागृहात कच्च्या कैद्यांची आणि शिक्षाधीन कैद्यांची संख्या वाढत आहेत. काही जिल्ह्यातील कारागृहात दुपटीपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे अनेकदा कारागृहात कैद्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कारागृहातील कैदी कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपक्रम राबवित आहेत.
त्यात आर्थिक स्थितीनेकमकुवत असलेल्या कैद्यांची जामिनाची रक्कम केंद्र सरकार भरणार असून अशा अनेक कैद्यांना कारागृहाबाहेर काढण्यात येत आहे. तसेच अन्य उपाय म्हणून ज्या कैद्यांची वर्तवणूक सकारात्मक आहे किंवा कैद्याच्या स्वभावात आमुलाग्र बदल झाला आहे, अशा कैद्यांना खुल्या कारागृहात पाठविण्याचा निर्णय कारागृहातील समिती घेते. सध्या राज्यात मोर्शी, पैठण, विसापूर, गडचिरोली आणि येरवडा येथेच खुले कारागृह आहे. या कारागृहांत सध्या ५०० ते ७०० खुले कैदी आहेत. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, धुळे,नाशिक, यवतमाळ. पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात अर्धखुले कारागृह आहेत. मात्र, येथे स्वतंत्र आस्थापना नसल्यामुळे येथील कारभार वा-यावर असल्याची माहिती समोर आली आहे.