भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : श्रीरामनवमी जन्मोत्सव शहरातील विविध मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. शोभायात्रेला शकुंतला सभागृहापासून सुरुवात झाली. याप्रसंगी शोभायात्रेत असलेल्या श्रीराम मूतीर्चे पूजन सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मान्यवर व आयोजन श्रीराम जन्मोत्सव नवयुवक समितीच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमध्ये डीजेच्या तालावर भाविकांनी ताल धरला. भजनी मंडळे, श्रीराम-लक्ष्मणसीता व हनुमानाचा देखावा, स्वामी नरेंद्र महाराज, उज्जैनचे महाकाल, शिर्डीचे साईबाबा, महाकाली, शेगावचे गजानन महाराज देखावा, अश्या विविध देखाव्याचे भाविकांनी दर्शन घेतले. धामणगाव रेल्वे येथील आझाद ग्रुपच्या ढोल ताशांनी गर्दीचे लक्ष वेधले.
हनुमान वेशभूषेतील देखाव्यातउपस्थित लहान बालके यावेळी श्रीराम जयघोषात सामील झाली होती. या शोभायात्रेत भगवान श्रीरामाची व हनुमानाची सुंदर आणि देखणी मूर्ती भक्तांच्याआकर्षणाचे स्थान ठरली. दरम्यान, शोभायात्रेतील श्रीराम मूर्तीचे जागोजागी पुष्पवर्षाव करून पूजन करण्यात आले. तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले. शोभायात्रा भंडारा- तुमसर मुख्य मार्गावरील शकुंतला सभागृह येथून निघून मातोश्री लॉन, नवीन बस स्थानक, जुना बस स्थानक चौक, नगरपरिषद चौक, जामा मज्जीत, सुभाषचंद्र बोस चौक, महात्मा गांधी चौक, जैन मंदिर चौक व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून तुमसरेश्वर महागणपती मंदिर परिसरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.