भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समाज कल्याण विभाग भंडारा अंतर्गत येणाºया अनुसूचित जाती व नव बौध्द मुलींची निवासी शाळा राजेदहेगाव यांना श्रीहरीकोटा येथील करफड सेंटर येथे शैक्षणिक सहल आयोजित केले आहे. मात्र विशेष म्हणजे ह्या सर्व ४० विद्यार्थिनी विमानप्रवास द्वारे करफड येथे जाणार आहे. अत्यंत गरीब, दुर्गम भागातील विद्यार्थिनी सरकारी शाळेत शिक्षण घेतात. त्यांनी साधी रेल्वे कधी बघितली नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी कधी गेले नाही. अशा विद्यार्थिनी यांना थेट विमानाद्वारे करफड सारख्या मोठ्या केंद्रावर भेट देण्याची कल्पना डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांनी आखली आणि त्यासाठी पालकमंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी लगेच मंजुरी दिली. आज दि. ७ एप्रिल रोजी सकाळी आ. नरेंद्र भोंडेकर तसेच जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी या विद्यार्थीनींना घेऊन जाणाºया बसला हिरवी झेंडी दाखवली. बस द्वारे ही विद्यार्थी गोंदिया एअरपोर्ट वरून हैदराबाद व हैदराबाद वरून चेन्नई येथे जातील.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकाºयांनी इसरो सारख्या मोठ्या संस्थेला भेट देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही शैक्षणिक सहल महत्त्वाची असल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या. तसेच प्रवासादरम्यान विद्यार्थिनींची काळजी घेण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले. या विद्यार्थिनींना सोडवायला पालक देखील जिल्हाधिकारी परिसरात आले होते. आपल्या मुली विमानात बसणार हे बघून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू बघायला मिळाले. अशा अभिनव उपक्रमाने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि ईतर खासगी विद्यार्थ्यांच्या सोबत स्पर्धेत नव्या जोमाने विद्यार्थी तय्यार होतील.मागील वर्षभरात या शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. कॉन्व्हेंटच्या धरतीवर येथे सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. येथे विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागु करण्यात आला आहे. सर्व क्लास रूम डिजिटल करण्यात आल्या आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात आला आहे. येथील विद्यार्थिनी राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. येत्या काळात सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी झुंबड लागेल यात शंका नाही.