सालेबर्डी/पांधी येथे आजपासून दोन दिवसीय हनुमान जयंतीचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यात गणेशपूर ते कवडसी या मार्गावर सालेबर्डी/पांधी येथे रिठाचा मारूती हे हनुमंताचे पुरातन देवस्थान आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर खूप जुने आहे. या ठिकाणी पूर्वी लोकवस्ती होती. मात्र, खूप जुन्या काळी येथे मुंगळ्यांचा प्रकोप वाढल्याने एक दुर्देवी घटना घडली. पाळण्यात टाकलेल्या बाळाला मुंगळ्यांनी खाऊन टाकले. त्यामुळे या घटनेने घाबरलेल्या नागरिकांनी गाव सोडले असे सांगितले जाते. त्यामुळे (रिठा) म्हणजे लोकवस्ती नसलेल्या गावातील हनुमंताचे हे मंदिर रिठाचा मारूती या नावाने ओळखले जाते. मारूतीची मूर्ती ही पाकळीच्या झाडाखाली असलेल्या पारावर स्थापित आहे. लोकांनी गाव सोडले मात्र हनुमंतांची पूजा-अर्चना करण्यासाठी गावकरी येथे नित्य नेमाने यायचे. मारूतीच्या दैवी अनुग्रहाची प्रचिती भाविकांना येत असल्याने येथे येणाºया भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.

मारूतीची सिंदूरचर्चित मुर्ती पाकळीच्या झाडाखाली आहे. मूर्तीच्या डोक्यावर छत्र किंवा आच्छादन नाही. त्यामुळे मूर्ती मंदिरात बंदिस्त नाही. गावकºयांनी काही वर्षांपूर्वी पाकळीच्या झाडांचा बुंधा सडल्याने फांद्यांना दोर बांधून तो ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढून तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, फांदीचा दोर तुटून ती फांदी ट्रॅक्टरचालकाच्या कानशिलात येवून धडकली. त्यामुळे चालक बेशुद्ध होवून ट्रॅक्टरखाली पडला. तसेच चालक नसताना ट्रॅक्टर दीड कि.मी. अंतरापर्यंत चालत जावून मिरचीच्या बागेतून पुढे नाल्यात जावून थांबला. परंतु, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच मिरचीच्या बागेलाही काही झाले नाही. भाविकांनी हनुमंतांच्या चमत्काराचा अनुभव घेतला. पूर्वी हनुमंताची मूर्ती मोठी होती. काही वर्षांपूर्वी मूर्तींवरील सेंदुराचे आच्छादन गळून पडले. ही मूर्ती आता मूळ स्वरूपात आहे. विशेष म्हणजे ती नैसर्गिक आणि मोकळ्या वातावरणात आहे हे विशेष. २०२० मध्ये आलेल्या महापुरात संपूर्ण परिसर जलव्याप्त होता. मूर्ती गळ्यापर्यंत पाणी होते. मात्र, ती पूर्ण बुडाली नाही, हे विशेष.

या मंदिराची ख्याती दूरवर असून पंचक्रोशीतलच नव्हे तर दूरदूरचे भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. भक्तीभावाने मागणे मागीतल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच भावनेतून येथे दिव्यत्वाची प्रचिती येणारे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. गणेशपूर ते कवडसी मार्गावर हे मंदिर स्थित आहे. येथे लोकवस्ती नसल्याने निरव शांततेचा अनुभव घेता येतो. आजुबाजूला हिरवीगार शेती, वृक्षवल्लीने नटलेला परिसर त्यामुळे हे ठिकाण एकांतप्रिय लोकांसाठी अनुरूप आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पक्क्याच्या सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मंदिराच्या सभोवताल तारेचे कुंपण करण्यात आले असून माजी जि.प. सभापती प्रेम वणवे यांच्या निधीतून एक छोटे सभामंडप या ठिकाणी बांधण्यात आले आहे. प्रागंणात हिरवगीर झाडे असून मुलांना खेळण्याचे साहित्य, सिमेंट खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवशी सहलीकरिता अनेक कुटुंब देवदर्शन व विरंगुळा म्हणून येथे हजेरी लावतात. मंदिराचा परिसर हिरवळीने नटलेला आणि रमणीय आहे. त्यामुळे भाविकांना हे वातावरण भुरळ पाडते.

दर शनिवारी आणि मंगळवारी भाविक येथे मोठ्या संख्येने मारूतीरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.या मंदिरात दत्त जयंती आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. भजन, पूजन, किर्तन व गोपालकाला केला जातो. हजारो नागरिक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात. दर शनिवारी मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने नवस बोलणारे कुटुंब येथे नतमस्तक होवून नवस पूर्ण करतात. मनोकामना पूर्ण झालेल्या एका भाविकाने मारूतीरायाला चांदीचा मुकूट अर्पण केला आहे. दिवसेंदिवस मारूतीरायावरील श्रद्धा आणि विश्वास अधिक वाढत असून येथे येणाºया भाविकांच्या संख्येत भर पडत आहे. मंदिराचे व्यवस्थापन व देखभाल करण्यासाठी जय हनुमान देवस्थान पंचकमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराची देखभाल व सांभाळ करण्याची जबाबदारी या कमिटीकडे आहे. कमिटीचे अध्यक्ष नजीर बांते, उपाध्यक्ष भोलाराम बोरकर, सचिव क्रिष्णा सिंदीमेश्राम यांच्यासह समितीचे एकुण ९ पदाधिकारी मंदिराचे व्यवस्थापन योग्यप्रकारे सांभाळत आहेत. हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास मोठा वाव आहे. मंदिराला सुरक्षा भिंत, भव्य प्रवेशद्वार, मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, सौर उर्जेवरील हायमास्ट लाईट, भाविकांना स्वयंपाकासाठी किचनशेड, प्रसाधनगृहे आदी सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *