भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मौजा तुडका, तालुका तुमसर येथील फादर अग्नल शाळेत शासनाने आदेशीत व निदेर्शीत केलेल्या पाठ्यपुस्तके, शैक्षणिक शुल्क व नेमून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक असल्याने शाळेत शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत शाळा व्यवस्थापनाला तक्रार केली असता शाळा व्यवस्थापनाकडून सात विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले आल्याचे दुदैर्वी प्रकार समोर आला असून शाळेत प्रवेश देखील नाकारले आहे त्यामुळे फादर अग्नेल शाळेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून माहिती घेतली असता सदर सात विद्यार्थ्यांच्या पालकांनी अवाजवी शुल्क भरण्यास विरोध केला.
सदर शुल्क हे नियमापेक्षा अधिक असल्याने त्यांनी अधिकचे शुल्क भरण्यास नकार दिला व अधिक्य शुल्क भरण्यास त्यांच्या विरोध होता परंतु शाळा व्यवस्थापन याबाबत चुकीच्या व भ्रामक प्रसार करून सदर विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नसल्यामुळे शाळेतून काढले असल्याचे दर्शवित आहे. संबंधित शाळेकडून शिक्षण हक्क कायद्याच्या नियमाची पायमल्ली, अनागोंदी कारभार व इतर नियमाचे पालन न करता अनाधिकृतपणे त्यांच्या मनमर्जीने शाळा सुरू आहे. शाळा प्रशासनाने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करून चिमुकल्या सात विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊन शाळेतून काढले. याबाबत पीडित पालकांनी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांच्याकडे लेखी तक्रार केली.
या सात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा अधिकार व हक्कापासून ते वंचित आहेत. या सात विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावे व शाळेत सुरू असलेल्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी गट शिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम, मनीष गजभिये, शुभम तांडेकर, हर्षल आंबिलडुके, शाकीब शेख, योगेश चिंधालोरे, मिलींद मदनकर, हरीश शेंडे, योगेश रंगवानी, सौरभ बावणे उपस्थित होते.