भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : हनुमान जयंती निमित्त शनिवार दि. १२ एप्रिल रोजी चांदपूर देवस्थानात भाविकांची चांगलीच गर्दी उसळली होती. पोलीस स्टेशन सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन हे आपल्या पोलीस ताμयासह बंदोबस्तावर पाळत ठेवून होते. यात्रेकरूसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थान कमेटीच्या वतीने ठिकठिकाणी पार्किंग झोन व टुरिस्ट गाड्यांची व्यवस्था होती. चांदपूर देवस्थानच्या पायथ्याशी असलेली पाण्याची टाकी भाविक भक्तासाठी स्नान व स्वयंपाकाचे साधन ठरले होते. हनुमान देवस्थान हे सातपुडा पर्वताच्या सानिंध्यात वचांदपूरच्या उंच टेकडीवर आहे. इंग्रज कालीन चांदपूर देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे.हनुमंताच्या दर्शनासाठी भाविक भक्त नागपूर, भंडारा, तुमसर, बपेरा, मध्य प्रदेशच्या बालाघाट, रामपायली, वरासिवनी व छत्तीसगड वरून दर्शनासाठी आले होते. लगतच असलेले ऋषिदेव व येथील लंगडा हनुमान सर्व दूरपर्यंत प्रसिद्ध आहे.
समर्थ रामदास स्वामी येथे दर्शनासाठी येऊन गेल्याचा दस्त ऐवजनात नमूद आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे विभाजन होण्यापूर्वी चांदपूर देवस्थानचा कारभार भोपाल वरून सुरू होता हे येथे उल्लेखनीय आहे. स्वयंभू व जागृत हनुमान मंदिरामुळे पावन झालेले चांदपूर हे छोटेसे गाव सर्व दूर प्रसिद्ध आहे. येथील हनुमानाची मूर्ती ७ फूट उंच असून त्याचे मुख दक्षिणेकडे तर नजर मात्र रामटेककडे आहे. येथे दरवर्षी पोळा, ऋषि पंचमी, मकर संक्रात व हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. हजारोच्या संख्येने यात्रेकरू येथे दर्शनासाठी येतात. देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेकरूंची विशेष व्यवस्था केली जाते हे येथे उल्लेखनीय आहे.